

खानापूर : एकीकडे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे तर निवडणूक आयोग संविधानाप्रमाणे काम करत नसून व्होट चोरांना मदत करीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुराव्यासहित केला असून देशातील निवडणूक आयोग भाजपाचा बटीक असल्यासारखे वागत असल्याचा आरोप देखील काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. भारतीय संविधानात देशाचा “निवडणूक आयोग” पण संविधानिक संस्था म्हणून येते परंतु सध्या हाच निवडणूक आयोग संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय झाला असून निवडणूक आयोगाविरुद्ध अखिल भारतीय कॉंग्रेसतर्फे देशभरात सह्यांची मोहीम राबवली जात आहे. साधारण पाच कोटी भारतीय नागरिकांच्या सह्याची मोहीम निवडणूक आयोगाच्या विरोधात राबविली जाणार आहे. यासंदर्भात खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे “व्होट चोर गद्दी छोड” अभियान राबविण्यात आले असून शिवस्मारकामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झाली. खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. बेळगाव जिल्ह्यातच नव्हे तर कर्नाटक राज्यात सर्वप्रथम खानापूर ब्लॉक काँग्रेसने हा उपक्रम राबविला असून राहुल गांधी यांच्या “व्होट चोर गद्दी छोड” अभियानास राज्यात खानापूर ब्लॉक काँग्रेसने सर्वप्रथम पाठिंबा दिला आहे.

यावेळी जिल्हा अध्यक्ष विनय नवलकट्टी यांनी या अभियानासंदर्भात कार्यकर्त्यांना माहिती दिली. यावेळी खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर बोलताना म्हणाल्या की, मी ज्या ठिकाणी प्रभारी म्हणून काम पाहते त्याच ठिकाणी हे सगळे झाले आहे. आता खानापूर तालुक्यात 15 ऑक्टोंबर पर्यंत सह्यांची मोहीम राबविली जाणार आहे. यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, काही लोक आमचा तालुका आहे असे म्हणतात. ते इतकी दशके कुठे होते? मी व माझ्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून तालुक्यात काँग्रेसला चांगले दिवस आणले आहेत. आता काही जणांना तालुका आपला वाटू लागला आहे. तालुक्यात मी कोणाचाही हस्तक्षेप होऊ देणार नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. सध्या होऊ घातलेली सह्यांची मोहीम संपल्यानंतर जिल्हा पालकमंत्री केपीसीसी अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना ब्लॉक काँग्रेसचे शंभर जणांचे शिष्टमंडळ प्रत्यक्ष जाऊन भेटून तालुक्यातील हस्तक्षेपासंदर्भात माहिती देणार आहे. तशीच वेळ आल्यास खानापूर ब्लॉक काँग्रेस हायकमांडला सुद्धा भेटण्यास मागे पुढे पाहणार नाही, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ॲड. आय. आर. घाडी यांनी, विद्यमान लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियपणावर बोलत त्यांचा चांगला समाचार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार महांतेश राऊत त्यांनी केले. कार्यक्रमाला खानापूर ब्लॉक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta