

खानापूर तालुका समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे खानापूर येथील शिवस्मारक येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केले. उपोषणादरम्यान सभा देखील झाली यावेळी व्यासपीठावरून खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, सीमा प्रश्न सोडवणूक हेच आमचे मुख्य ध्येय आहे. सीमा प्रश्न सुटेपर्यंत आपण सर्वांनी एकजुटीने हा लढा दिला पाहिजे. सीमावासीय आपला लढा सनदशीर मार्गाने लढत आहेत. आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. सीमा प्रश्न लवकरात लवकर सुटेल यात मात्र शंका नाही. पुढे बोलताना ते म्हणाले की, कर्नाटक विधानसभेत तत्कालीन मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा यांनी सीमा प्रश्नाबाबत बोलताना मान्य केले आहे की बेळगावसह ८६५ गावे ही चुकीच्या पद्धतीने कर्नाटकात डांबण्यात आले आहे. हा भाग महाराष्ट्राचा आहे त्यांना महाराष्ट्रात सामील करण्यात यावे असे राजपत्रात देखील नमूद केले आहे त्याचा पुरावा देखील मी आमदार असताना सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे असे त्यांनी सांगितले व जोपर्यंत ८६५ गावांसह संपूर्ण सीमा भाग महाराष्ट्रात विलिन होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही असे मतही व्यक्त केले.
महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई म्हणाले की, मागील ६९ वर्षांपासून सीमावासीय महाराष्ट्रात जाण्यासाठी हा लढा देत आहेत. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळला जातो. जोपर्यंत सीमा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हा लढा असाच अविरतपणे चालू राहणार त्यासाठी सर्व मराठी भाषिकांनी या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे खानापूर शहरासह नंदगड, जांबोटी आदी भागात पत्रके वाटून कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याला मराठी भाषिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व व्यवहार बंद ठेवले व आपली महाराष्ट्रात जाण्याची लोकेच्छा दाखवून दिली.
यावेळी रणजित कल्लाप्पा पाटील, पांडुरंग सावंत, हनुमंत जगताप, राजाराम देसाई, गोपाळ हेबाळकर, मारुती परमेकर आदींनी आपले विचार मांडून महाराष्ट्रात जाण्याची इच्छा प्रकट केली व आजही मराठी भाषिकांच्या अंतकरणात सीमा प्रश्नाबद्दल तळमळ असल्याचे सांगितले आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी
परदेश मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, आबासाहेब दळवी, संजीव पाटील, जयराम देसाई, कृष्णा कुंभार, कृष्णा मन्नोळकर, रमेश धबाले, मारुती गुरव, वसंत नावलकर, विलास बेळगावकर, गोपाळ पाटील, प्रकाश चव्हाण, जगन्नाथ बिरजे, बाळासाहेब शेलार, अजित पाटील, रुक्माणा झुंजवाडकर, सीमा सत्याग्रही शंकरराव पाटील, सीमा सत्याग्रही नारायण लाड यांच्यासह समितीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta