
खानापूर : खानापूर तालुक्यातील सुलेगाळी या ठिकाणी विद्युत तारेच्या प्रवाहाचा धक्का लागून घडलेल्या धक्कादायक घटनेत दोन जंगली हत्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हेस्कॉम खात्याच्या दुर्लक्षपणामुळे तुटून पडलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात येऊन ही दुर्दैवी घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी की, देवराई गावाजवळील सुलेगाळी येथील शेतकरी गणपती सातेरी गुरव आणि परिसरातील इतर शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारे झटका करंट मशीन लावले होते. अशा प्रकारचे मशीन तालुक्यातील अनेक शेतकरी वापरत असले तरी, हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे शेतातून गेलेली वीजवाहिनीची तार तुटून काही दिवसांपासून जमिनीवर पडलेली होती.
तरीही, वीज खाते याकडे दुर्लक्ष करत राहिले. काल (शनिवार) आणखी एक तार तुटून पडल्याने ती झटका करंट लावलेल्या तारेच्या संपर्कात आली. त्यामुळे त्या तारेतून विद्युत प्रवाह सुरू झाला. दरम्यान, अन्नाच्या शोधात त्या ठिकाणी आलेले दोन जंगली हत्ती त्या विद्युत तारेला स्पर्श झाला आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून दोन्ही हत्तींच्या मृतदेहांची तपासणी केली असून, आवश्यक कायदेशीर सोपस्कार हाती घेतले आहेत.
——————————————————————–
या घटनेनंतर हलगा गावचे रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते रणजीत पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “ही दुर्घटना हेस्कॉम खात्याच्या स्पष्ट दुर्लक्षामुळे घडली आहे. तुटलेल्या विद्युत तारांची दुरुस्ती वेळेत करण्यात आली असती, तर हे दोन निरपराध प्राणी वाचले असते. त्यामुळे संबंधित हेस्कॉम कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
Belgaum Varta Belgaum Varta