खानापूर : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा समाजातर्फे दि. 4 मार्च रोजी मेळावा आणि प्रीतीभोजनाचा कार्यक्रम कौंदल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी क्षत्रिय मराठा समाजाच्या खानापूर तालुका महिला अध्यक्षपदी डॉ. सोनाली सरनोबत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला दिलीप पवार, डी. एम. भोसले, अभिलाष देसाई, तानाजी कदम, अमृत पाटील, नगरसेवक नारायण ओगले, संदीप शेम्बले, मारुती सुतार, राजू कांबळे, अमोल बेळगावकर, ऍड. केशव कल्लेकर, रमेश पाटील, संजू भोसले, हणमंत गुरव अखिल भारतीय कुस्तीगीर संघटना तसेच मराठा समाजातील 200 हून अधिक मान्यवर उपस्थित होते.
एकीच्या प्रक्रियेत दुहीचा प्रयत्न
वास्तविक पाहता हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून क्षत्रिय मराठा समाजाचा होता. क्षत्रिय मराठा समाज ही एक संघटना आहे जी मराठा समाजासाठी कार्यरत आहे. त्यामध्ये सर्वपक्षीय लोक मराठा समाजाच्या वृद्धीसाठी कार्य करतात. डी. एम. भोसले हे देखील या संघटनेत कार्यरत असल्याने ते या कार्यक्रमात उपस्थित होते. खानापूर तालुक्यात सध्या समितीमध्ये एकीची प्रक्रिया सुरू आहे. त्या अनुषंगाने दिगंबर पाटील गटाने एक त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे, त्या समितीमध्ये डी. एम. भोसले आहेत. त्यामुळे काही समितीद्वेष्ट्यानी या घटनेचा विपर्यास केला असून समितीच्या एकीच्या प्रक्रियेत बाधा निर्माण करण्याच्या हेतूने समाजमाध्यमातून चुकीचा संदेश पोचवीत आहेत ही समितीच्या दृष्टीने खेदजनक घटना म्हणावी लागेल.