
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील सरकारी दवाखान्यातील डॉक्टरसह कर्मचारी वर्गाने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून डॉक्टर व कर्मचारी वर्गाला नाहक त्रास देणार्यांवर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन दंडाधिकारी प्रविण जैन व पीएसआय संगमेश जालीहाळ यांना देण्यात आले
टीएचओ डॉ. संजय नांद्रे व डॉ. नारायण वड्डीन यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर व कर्मचारी वर्गाने निवेदनात म्हटले आहे की, तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील व सहकारी तसेच ग्राम पंचायत संघटनांचा नाहक त्रास दूर करावा.
सोमवारी दि. 21 रोजी या सर्वांनी सरकारी दवाखान्यात येऊन कामात व्यत्यय आणला. वाईट प्रकारचे आरोप केले. सरकारी दवाखान्यातील प्रत्येक विभागाची पाहणी केली. कर्मचारी वर्गाला अपमानास्पद वागणुक दिली. पैशाची मागणी केली. त्यामुळे डॉक्टरसह कर्मचारी भयभित झाले आहेत. त्यामुळे भरमाणी पाटील यांच्यावर कारवाई व्हावी. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत कामबंद करून आंदोलन छेडू असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी तहसीलदार प्रविण जैन व पीएसआय संगमेश जालीहाळ यांनी निवेदनाचा स्विकार करून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले.
यावेळी डॉ. संजय नांद्रे, डॉ. नारायण वड्डीन, डॉ. सुरेश राय, डॉ. तस्लीन बानू, डॉ. वरदाज नायक, डॉ. प्रभूराज तोडकर, डॉ. पूजा एम बी आदींसह डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी भरमाणी पाटील यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यांनी आपले मत मांडले.
Belgaum Varta Belgaum Varta