खानापूर : तालुक्यातील जनतेला रोजगार आणि विकासाचा दूरदृष्टीकोण ठेवून भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याची स्थापना करणारे माजी आमदार कै. निळकंठराव सरदेसाई यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी व्हावे, हा दृष्टिकोन ठेवत महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला साखर कारखान्याने त्यांचा पुतळा कारखान्याच्या आवारात स्थापन करण्याचे ठरविले आहे. यास खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा पूर्ण पाठिंबा आहे, असे विचार माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी व्यक्त केले.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येथील शिवस्मारक येथे पार पडली त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोल होते.
बाळासाहेब शेलार म्हणाले, समितीच्या नावावर नावारूपाला आलेले माजी आ. अरविंद पाटिल यांनी स्वार्थासाठी राष्ट्रीय पक्षाशी जवळीक साधून चळवळीत तेढ निर्माण करण्याचे कार्य केले आहे. चळवळीचा घात केला आहे. समितीची चळवळच नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याआधीही असे प्रयत्न झाले, मात्र चळवळ संपलेली नाही आणि संपणार नाही. चळवळीला मोठ्या नेतृत्वाची गरज आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यामुळे नेतृत्वाविना कार्यकर्ते विखुरले जात असून हे आगामी निवडणुका तसेच चळवळीला धोकादायक आहे. त्याकरिता खानापूर समितीच्या एकीची जबाबदारी घेतलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने त्वरित निर्णय घ्यावा.
मराठी भाषिक तरुणांनी राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याच्या ताटाखालचे मांजर बनू नये, जबाबदारी ओळखून समितीशी बांधील राहून कार्यरत रहावे, असे आवाहन आबासाहेब दळवी यांनी केले.
यावेळी प्रकाश चव्हाण, शिवाजी पाटील, रुक्माणा झुंजवाडकर, यशवंत बिरजे, अर्जुन देसाई, आदींनी विचार मांडले. यावेळी नारायण कापोलकर, शंकर गावडा, देवप्पा भोसले, सी एल पाटील, सुरेश देसाई, नारायण लाड, प्रवीण पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.