बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकी व्हावी यासाठी मध्यवर्ती समिती प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सोमवारी शिवस्मारक येथे बोलविण्यात झालेली बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. याची दखल समिती कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून खानापूर तालुक्यात समितीमध्ये एकी व्हावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. तसेच तालुक्यामध्ये एकी होणे गरजेचे असल्याने शिवस्मारक येथे होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले होते. तसेच बैठकीबाबत विविध गावांमध्ये जनजागृती देखील करण्यात आली होती. परंतु मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी रिंग रोड संदर्भातील बैठक आणि इतर विषयाबाबत व्यस्त असल्याने येत्या दोन दिवसात खानापूर तालुका समितीत एकी व्हावी यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात आल्यामुळे उद्या होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र मध्यवर्ती समितीने खानापूर तालुक्यात सर्वांना एकत्र आणण्याची जबाबदारी घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे. तसेच येत्या दोन दिवसात नियोजन बैठकीचे नियोजन केले जाणार आहे.
…………………………………………………………
समितीची संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खानापूर येथील एकीची प्रकिया लवकरच पुर्ण केली जाईल.
– प्रकाश मरगाळे, खजिनदार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती.
Belgaum Varta Belgaum Varta