Thursday , November 21 2024
Breaking News

कोल्हापूरचं ठरलं, हसन मुश्रीफ-संजय मंडलिकांमध्ये रंगणार लोकसभेची कुस्ती?

Spread the love

 

कोल्हापूर : हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी ज्या आमदारांच्या मदतीने प्रा. संजय मंडलिकांनी शिवसेनेच्या तिकीटावर कोल्हापूर लोकसभेचे मैदान सहजपणे मारले, त्याच मंडलिकांना आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र मुश्रीफांच्या विरोधात शड्डू ठोकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. या कुस्तीत खासदार धनंजय महाडिक हे प्रचाराचे भाजपचे प्रचार प्रमुख असणार हे विशेष. शिंदे गटाच्या बंडखोरीने कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण पूर्ण ३६० अंशानेच फिरल्याने नवीन समीकरणे आता दिसणार आहेत.

अडीच वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मंडलिक हे शिवसेना व भाजपा युतीचे तर महाडिक हे राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे उमेदवार होते. पण ‘आमचं ठरलंय’ असे म्हणत आमदार सतेज पाटील यांनी उघडपणे शिवसेनेचा प्रचार केला. मुश्रीफांनी प्रचारात फारसे सक्रिय न होता एकप्रकारे मंडलिकांना मदत केली. याचा परिणाम म्हणून महाडिकांना मोठा पराभव पत्करावा लागला. आता मात्र जिल्ह्याचे राजकारण अचानक बदलले आहे. ज्या पाटील आणि मुश्रीफ यांच्यामुळे मंडलिक खासदार झाले, त्या दोघांची विनंती धुडकावून त्यांनी बंडखोरीचा झेंडा हातात घेतला. यामुळे आगामी काळात त्यांना या दोघांविरोधात लढाई लढावी लागणार आहे.

मंडलिक विरुद्ध मुश्रीफ अशी अटीतटीची कुस्ती होणार?

मंडलिक हे शिंदे गटात गेल्याने दीड वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार असतील हे निश्चित आहे. कारण महाडिक राज्यसभेचे खासदार झाल्याने या पक्षालाही ताकदीचा उमेदवार हवाच होता. तो आता मिळाला आहे. पण मंडलिकांना शह देण्यासाठी दोन्ही काँग्रेसकडून तगडा उमेदवार देण्यात येईल. मुश्रीफांचे नाव त्यामध्ये आघाडीवर असेल. जागा राष्ट्रवादी पक्षाकडे असल्याने संभाजीराजे, के.पी. पाटील, ए.वाय. पाटील अशी नावे चर्चेत येतील आणि शेवटी मुश्रीफांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल अशी शक्यता आहे. तसे झाल्यास मंडलिक आणि मुश्रीफ अशी अटीतटीची कुस्ती जिल्ह्यात पहायला मिळेल.

मुश्रीफ-बंटींनी मंडलिकांना मदत करुन महाडिकांना पाडलं, तेच महाडिक मंडलिकांचे प्रचारप्रमुख असणार

ज्या महाडिकांना मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या मदतीने मंडलिकांनी पराभूत केले, तेच महाडिक मात्र नव्या समीकरणात भाजपचे प्रचारप्रमुख असतील. कारण ते राज्यसभेवर गेल्याने लोकसभा लढण्याची चिन्हे जराही नाहीत. यामुळे मंडलिकांच्या प्रचारात महाडिक यांच्यासह आमदार प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, कदाचित चंद्रदीप नरके, समरजित घाटगे, शक्यतो आमदार राजेश पाटील हे मैदानात उतरतील. याउलट त्यांच्या पराभवासाठी सतेज पाटील, पी. एन. पाटील, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील असे नेते मुश्रीफांच्या प्रचारात उतरतील. यामुळे मात्र कोल्हापूर लोकसभेची कुस्ती चांगलीच रंगण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीला अजून दीड ते पावणे दोन वर्षाचा कालावधी आहे. तोपर्यंत अजून बऱ्याच राजकीय उलथापालथी होतील. यामुळे आज तरी मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यात लढतीची चर्चा सुरू असली तरी तेव्हा मंडलिकांविरोधात मैदानात कोण उतरणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या तरी जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ आणि पाटील यांच्या विरोधात भाजपची नवी टिम उभी राहणार आहे. ज्यामध्ये महाडिक, मंडलिक यांच्यासह आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, आबिटकर, नरके, क्षीरसागर, समरजित घाटगे, कुपेकर अशा नेत्यांच्या नव्या गटाचा समावेश असणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

मतदान केंद्र येती घरा….

Spread the love  कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 10 विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाला सुरुवात कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *