कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार
कोल्हापूर : कोल्हापुरात अपहरण करुन खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टोप संभापूरमधील हॉटेल व्यावसायिकाचे आठ ते दहा जणांच्या टोळीने अपहरण करुन सुटकेसाठी 20 लाखांची खंडणी मागितली होती. यामधील 5 लाख रुपये मिळाल्यानंतर व्यावसायिकाला सोडून देण्यात आले. ही घटना शिरोली एमआयडीसी परिसरात घडली. हॉटेल मालकाच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.
हातकणंगले तालुक्यातील नागावचे सादिक मुल्लाणी यांचे टोप संभापूरमध्ये हॉटेल आहे. 17 जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता सादिक मुल्लाणी यांचे अपहरण करण्यात आले होते. खंडणीखोरांनी त्यांच्या सुटकेसाठी कुटुंबीयांकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. सादिक यांचे वडील रेहमान यांनी 18 जानेवारी रोजी पाच लाख रुपये टोप येथील बँक खात्यात जमा केले. त्यानंतर रात्री उशिरा सादिक मुल्लाणी यांना खंडणीखोरांनी सोडून दिले.
व्यवसायातील आर्थिक व्यवहारातून अपहरण झाल्याचा पोलिसांचा अंदाज
रेहमान मुल्लाणी यांनी 19 जानेवारीला पोलीस मुख्यालयात तक्रार दिली. शुक्रवारी (20 जानेवारी) शिरोली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला. तपासात खंडणीतील पाच लाख रुपये टोपच्या फेडरल बँकेतून काढले आहेत. व्यवसायातील आर्थिक व्यवहारातून हे अपहरण झाले, असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta