प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्यानिमित्त कागल येथे नियोजन बैठक
कागल (वार्ता) : भाजपाचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते समरजीतसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली कागल विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुकांच्या अनुषंघाने शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि पेज प्रमुख यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याची केलेली तयारी वाखाणण्याजोगी आहे. भाजपाच्या लोकसभेसाठीच्या “महाविजय 2024″या संकल्पनेच्या पूर्णत्वासाठी ही तयारी निर्णायक ठरणार असून कागल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील भाजपचा झेंडा अटकेपार लागल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.
कागल येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नियोजित जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
खासदार महाडिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक लोकप्रिय, लोकहिताच्या योजना गेल्या दहा वर्षांत राबविल्या आहेत.त्याअनुषंगाने आज सर्वत्रच भाजपमय वातावरण झाले असून आगामी सर्वच निवडणुकांमध्ये याचे सकारात्मक पडसाद उमटणार आहेत.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे म्हणाले, कागल विधानसभा मतदारसंघातील एकूण 352 बुथपर्यंत आम्ही कामांच्या माध्यमातून व्यक्तिशः पोहोचलो आहोत. कांही ठिकाणी आम्ही महिलांना बूथ प्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली असून मतदार संघात आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राहुल देसाई यांनी येत्या सात ऑक्टोबर रोजी गडहिंग्लज येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, गडहिंग्लज शहराध्यक्ष सुदर्शन चव्हाण, प्रकाश पाटील,शाहूचे संचालक सचिन मगदूम, सतिश पाटील आदी उपस्थित होते.
स्वागत तालुकाध्यक्ष उत्तम पाटील यांनी केले. जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी आभार यांनी मानले.