इम्साचे अध्यक्ष गणेश नायकूडे यांची मागणी
कोल्हापूर (वार्ता) : कोरोनाच्या सुरवातीपासून दोन वेळा केलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. दोन वर्षे विद्यार्थी शाळेपासून दूर राहिल्यामुळे त्याचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अन्य आस्थापनाना दिलेल्या सवलतीप्रमाणे कोरोना नियमांची आवश्यक ती अमलबजावणी करत शाळा 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी द्यावेत अशी मागणी इंग्लिश मिडीयम स्कूल असोशियशन तथा इम्साचे अध्यक्ष गणेश नायकूडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
गणेश नायकूडे म्हणाले, मागील दोन्ही लॉकडाऊनमध्ये शासनाने शाळा बंद करण्याबाबत खूप आतताईपणे निर्णय घेतला गेला. हा निर्णय घेत असताना विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक नुकसानीचा विचार केला गेला नाही. त्यामुळे देशाच्या भावी नागरिकांच्या भविष्याबद्दल शासनास काळजी नसल्याची भावना संबंधीत सर्वच घटकांमध्ये वाढीस लागली आहे. शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क आहे व शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कावर वारंवार गदा येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह समाजाचे व देशाचे अतोनात नुकसान होत आहे. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देऊन शासनाने शाळांमध्ये 50 टक्के उपस्थितीत परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना आम्ही देत आहोत. याबाबतीत विद्यार्थी व शाळांना योग्य न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याची आमची तयारी आहे.
ते म्हणाले, शाळा बंद ठेवून ऑनलाइन शिक्षणाचा आग्रह धरला तरी त्यात प्रचंड मोठे अडथळे आहेत. गरीब पालकांकडे मोबाईल नसणे, मोबाईल असूनही रेंज नसणे व सर्वकाही असताना ऑनलाइन शिक्षण मुलांच्या पचनी न पडणे यामुळे ऑनलाइन शिक्षणाबाबत नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. मुलांना ऑनलाइनपेक्षा शाळेत ऑफलाइन शिक्षणच महत्त्वाचे आहे, याबाबत पालक सजग झाले आहेत. ज्या पालकांना रेशन खरेदीसाठीचे पैसे नाहीत त्यांना अँड्राईड मोबाईल घ्या म्हणणे तसेच रिचार्ज करत राहा असे म्हणणे कितपत योग्य आहे. शिवाय मुले त्याचा वापर ऑनलाईन शिक्षणासाठीच करतील याची हमी शासन घेणार आहे का.
शासनाच्या आदेशाचा सन्मान राखून कोल्हापूर जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा शनिवार, दिनांक 15 जानेवारी 2022 पर्यंत बंद राहतील. शासनाने 50 टक्के विद्यार्थ्यांना उपस्थितीचा निर्णय द्यावा अथवा शिक्षक-पालक संघास सर्वाधिकार द्यावेत अन्यथा सोमवार, दिनांक 17 जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू राहतील यामुळे होणार्या सर्व नुकसानीची जबाबदारी शासनाची राहील, अशा आशयाचे निवेदन माननीय जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांना देण्यात आले. याबाबतीत विद्यार्थी व शाळांना योग्य न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा इंग्लिश मेडियम स्कूलस् असोसिएशनच्या वतीने मा. पालकमंत्री व मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
पत्रकार परिषदेला संस्थापक महेश पोळ, कार्याध्यक्ष के. डी. पाटील, उपाध्यक्ष एन. एन. काझी, सचिव नितीन पाटील, सहसचिव विल्सन वासकर, खजिनदार माणिक पाटील, क्रीडा समिती अध्यक्ष सचिन नाईक, शहराध्यक्ष अमर सरनाईक, जिल्हा कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत पाटील, किरण माळी, मोहनराव माने, पी. आय. बोटे व संस्थाचालक उपस्थित होते.
Check Also
मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार जनजागृतीला गती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे
Spread the love जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा कोल्हापूर (जिमाका): मतदानासाठी केवळ आठवडा …