
कोल्हापूर : बेळगावात कन्नड नामफलकांच्या सक्तीचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. बेळगाव महाराष्ट्राच्या हक्काचे, ते भविष्यात महाराष्ट्रातच येणार असे सांगत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आज कोल्हापूर सीमेवरील कन्नड बोर्ड उखडून जाळून टाकले.
कर्नाटक सरकारने बेळगावसह सीमाभागात दुकाने, आस्थापनांना कन्नड भाषेतील नामफलक अनिवार्य केले आहेत. मात्र सरकारने कारवाई करण्याआधीच काही कन्नड संघटनांनी कन्नड वगळता मराठी, इंग्लिश आणि हिंदी भाषेतील बोर्डची नासधूस करून दुकानमालकांवर दादागिरी करत धुडगूस घातल्याच्या घटना बेळगावात वारंवार घडत आहेत. कर्नाटक सरकारने नामफलकांवर ६०% कन्नड भाषेचा वापर अनिवार्य केल्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे कन्नडेतर व्यापारी संकटात सापडले आहेत. कर्नाटक सरकार व कन्नड संघटनांच्या या दबावाचे तीव्र पडसाद आज कोल्हापूर जिल्ह्यात उमटले. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी यावर आक्रमक भूमिका घेत उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली तावडे हॉटेल, गोकुळ शिरगाव परिसरात लावलेले कन्नड बोर्ड उखडून टाकले. कर्नाटक सरकारच्या आणि कन्नड संघटनांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देत उखडून टाकलेले कन्नड बोर्ड पेटवून दिले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना उपनेते संजय पवार यांनी, कर्नाटक व महाराष्ट्र सरकारलाही खडे बोल सुनावले. बेळगावात मराठी पाट्या काढण्यात येत आहेत. मराठी माणसांवर अन्याय केला जात आहे. बेळगाव आमचं हक्काचं आहे, ते भविष्यात महाराष्ट्रातच येणार आहे. तेथील मराठी भाषिकांवर कन्नड बोर्ड लावण्यासाठी सक्ती, दादागिरी केली जातेय हे मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे. अशा दादागिरीला आम्ही चोख उत्तर देऊ, महाराष्ट्र सरकारने यात तातडीने लक्ष घालावे. एवढे सगळं होत असताना महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री, मुख्यमंत्री कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला. मराठीवर त्यांचं खरं प्रेम असेल तर त्यांनी यात तातडीने लक्ष घालावे. महाराष्ट्रातील कन्नड बोर्ड काढण्याचे आदेश सर्व जिल्हा प्रशासनांना, जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी त्यांनी केली.यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, कर्नाटक सीमेवर कोल्हापूर जिल्ह्यात शिवसैनिकांनी बेळगावसह सीमाभागातील कन्नडसक्तीच्या विरोधात अचानक केलेल्या आंदोलनामुळे कानडी संघटनांचे धाबे दणाणले असून, आज दिवसभर बेळगावात या आंदोलनाची चर्चा जोरात सुरु होती.
Belgaum Varta Belgaum Varta