
हुपरी : भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर गडकोट मोहिमेदरम्यान एक (२५ वर्षीय) तरुण दरीत कोसळल्याची घटना घडली. यामध्ये हुपरी ता. हातकणंगले येथील तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. सागर पांडुरंग वाईगडे (वय २५, रा. हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी भोर पोलीस ठाण्यात रोहन गोंधळी यांनी माहिती दिली. भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुपरी येथील दहा-बारा तरुण गडकोट मोहिमेसाठी रायरेश्वरावर येथे (बुधवार) मुक्कामी आले होते.
गुरुवारी सकाळी ९ वाजता ते प्रतापगडाकडे जायला निघाले. त्यावेळी पायवाटेने जाताना सागरचा पाय घसरून तो दरीत कोसळला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याचा शोध घेतला. पाऊण तासानंतर तो दरीत जखमी अवस्थेत आढळला. मात्र, त्याला दरीतून बाहेर आणण्यासाठी त्यांना रस्ता सापडला नाही. त्यामुळे ते दरीत फिरत राहिले.
दरम्यान, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भोरच्या सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू टीम भोरच्या जवानांनी दरीत शोध घेऊन त्यास उपचारासाठी भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूमूळे हुपरीत हळहळ व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta