Tuesday , September 17 2024
Breaking News

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील तपासणी चौक्यांना अधिक मजबुती देण्याचा समन्वय बैठकीत निर्णय

Spread the love

 

कोल्हापूर (जिमाका) : येत्या दोन महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व बेळगाव प्रशासनाने आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमा चौक्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय समन्वयक बैठकीत घेतला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रेसीडन्सी क्लब कोल्हापूर येथे याबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी कोल्हापूरच्या सीमेला लागून असलेल्या कर्नाटक जिल्ह्यातील व लगतच्या इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनीही झालेल्या चर्चेत भाग घेतला. जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले की, निवडणूक आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे आणि कायमस्वरुपी चेकपोस्ट सोबतच सीमेवर तात्पुरत्या चेकपोस्टची स्थापना करणे आवश्यक आहे यासाठी त्यांना पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले पाहिजे. यावेळी बेळगाव जिल्हाधिकारी यांनीही आढावा बैठकीत सहभाग घेतला आणि निवडणुकीवर परिणाम होऊ शकणाऱ्या चलन, मद्य आणि इतर वस्तूंची अवैध वाहतूक रोखण्यासाठी दक्षता मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदिप घुगे उपस्थित होते तर बेळगाव, सिंधुदूर्ग, रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक ऑनलाईन उपस्थित होते. संबंधित बैठकीत क्षेत्रीय कामकाज पाहणारे सीमा भागातील अधिकारीही कोल्हापूर येथे उपस्थित होते.

निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही मालाची वाहतूक करण्यासाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ट्रकच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय उपस्थित अधिकाऱ्यांनी घेतला. निवडणूक आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन होणार नाही याची खात्री करण्यासाठी दोन्ही राज्यातील व शेजारील जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण समन्वयासाठी सहमती दर्शवली. ग्रामीण भागात धावणाऱ्या वाहनांची प्रत्येक ठिकाणी कसून तपासणी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. निवडणूक काळात चलन, मद्य आणि इतर वस्तूंची अवैध वाहतूक रोखण्यासाठी सीमा भागातील क्षेत्रीय अधिकारी यांनी समन्वय ठेवून काम करावे तसेच आपापसात समन्वयासाठी व्हॉट्स ॲपचा वापर करुन जलदगतीने काम करावे, असे निर्देश वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. कोल्हापूर येथे कर्नाटक, गोवा, सिंधूदुर्ग, सांगली व रत्नागिरी येथून मोठ्या प्रमाणात विविध साहित्य, वस्तू तसेच औद्योगिक वाहतूक होत असते. यामुळे सर्व सीमा भागात प्रमुख रस्त्यांसह आतील लहान मार्गावर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी यांनी नमूद केले. यावेळी कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील विविध चेकपोस्ट बाबत माहिती सादर केली. सांगली जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी सादरीकरण करुन सांगलीमधील माहिती दिली.

या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी केले तर आभार निवासी उप जिल्हाधिकारी संजय तेली यांनी मानले. यावेळी सीमाभागातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासनातील संबंधित अधिकारी, अपर जिल्हाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राजकोट येथील शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्या प्रकरणी चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात

Spread the love  कोल्हापूर : सिंधुदुर्गमधील पुतळ्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट आरोपी चेतन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *