
कोल्हापूर : शिये (ता. करवीर) गावच्या हद्दीत एका परप्रांतीय कुटुंबातील १० वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि.२२) घडली आहे.
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रामनगर येथे गुडूसिंग अग्रहरी हे आपली पत्नी आणि ५ मुले यांच्यासह राहतात. ते रोजगारासाठी बिहार राज्यातून तीन वर्षांपूर्वी येथे आले आहेत. ते व त्यांची पत्नी शिरोली एमआयडीसीमधील एका कारखान्यात कामाला जातात. त्यांना तीन मुले आणि दोन मुली अशी पाच आपत्ये असून परिस्थितीमुळे शिक्षण न घेता ती घरीच असतात. बुधवारी (दि.२१) सकाळी पती, पत्नी कामाला गेले होते. दुपारी १२ च्या सुमारास त्यांचा मामा याठिकाणी आला आणि जेवण करून झोपला. तेव्हा गुड्डूसिंग याची १० वर्षाची मुलगी घरीच होती. दुपारनंतर मात्र, ती दिसून आली नाही. बराच वेळ वाट पाहून तिच्या आई, वडील, मामा आणि इतरांनी शोध सुरु केला. पण ती मिळून आली नाही. रात्री उशिरा नातेवाईकांनी ती बेपत्ता असल्याची फिर्याद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याला दिली. त्यानुसार सपोनि पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रात्रभर शोध घेतला.
दरम्यान, आज सकाळी श्वान पथक पाचरण करून शोध घेतला असता श्वानाने घरातील साहित्याचा वास घेऊन माग काढत जवळच असलेल्या उसाच्या शेतात धाव घेतली. याठिकाणी पोलिसांनी तपास करताना मुलीचा मृतदेह मिळून आला. सपोनी पंकज गिरी यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून माहिती दिली आणि सदर घटनेचा पंचनामा केला. फॉरेन्सिक लॅबचे पथक मागवून या ठिकाणी मृतदेहाचे आणि वस्तूंचे काही नमुने घेण्यात आले. आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगीच्या मृतदेहाशेजारी काही अंतरावर तिचे अंतरवस्त्र आणि पायातील चपला पडल्या होत्या. यामुळे तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली.
शवविच्छेदन व न्यायवैद्यकचा अहवाल मिळाल्यानंतर तपासाला गती
घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तातडीने धाव घेतली. व तपास कामात योग्य मार्गदर्शन केले. घटनास्थळी करवीर विभागीय पोलीस अधीक्षक सुजीत क्षीरसागर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सह पोलीस फाटा हजर होता. शवविच्छेदन व न्यायवैद्यकचा अहवाल मिळाल्यानंतर तपासाला गती येईल. दरम्यान, संशयित म्हणून काही जणांना ताब्यात घेतले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta