कोल्हापूर : फक्त कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील आश्वासक चेहरा असलेल्या भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी भाजपला अखेर सोडचिठ्ठी दिली आहे. आज (23 ऑगस्ट) कागलमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समरजित यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून समरजित घाटगे भाजपला सोडचिठ्ठी देणार याची चर्चा रंगली होती. त्यावर आज अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालं आहे. 3 सप्टेंबर रोजी कागलमधील गैबी चौकामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये समरजित घाटगे तुतारी फुंकणार असल्याची घोषणा जयंत पाटील यांनी केली.
3 सप्टेंबरच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन कार्यकर्त्यांना जयंत पाटील यांनी केले. जयंत पाटील यांनी सांगितले की पवार साहेब कायम समरजित घाटगे यांच्या पाठीशी राहतील. त्यामुळे समरजित घाटगे यांचं लीड किती असणार ते मोजा. दोन महिन्यांमध्ये सरकार आपलंच येणार आहे तुम्ही काळजी करू नका. समरजित यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो असे जयंत पाटील म्हणाले. गेले वर्षभर माझ्या मनामध्ये असलेली चिंता आज मिटली असून त्यामुळे मी आनंद व्यक्त करत असल्याचे जयंत पाटील म्हणाले. फुले शाहू आंबेडकर यांचा विचार सोडल्यानंतर बहुजन समाज कसा एकवटतो हे लोकसभेला तुम्ही दाखवून दिल आहे. आता विधानसभेला देखील दाखवून द्यायचं असल्याचे त्यांनी सांगितले.