सिद्धगिरी हॉस्पिटलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
कोल्हापूर : सिद्धगिरी हॉस्पिटलने जगातील दुर्मिळ आणि मेंदूच्या रक्तवाहिन्याचा सर्वात मोठा फुगवटा असणाऱ्या आजारावरील ब्रेन बायपास सर्जरी यशस्वी केली. ८ वर्षापासून पीडित आणि आजारामुळे दोन्ही डोळे निकामी झालेल्या रुग्णावर अगदी बेंगलोर पर्यंत शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शवण्यात आली होती. तसेच यासाठी १० ते १२ लाख इतका खर्च सांगण्यात आला होता. अशा परिस्थितीत दुर्मिळ आणि अत्यंत अवघड अशा शस्त्रक्रियेचे आव्हान हॉस्पिटलचे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के सर आणि त्यांच्या टीमने स्वीकारून ते यशस्वी करून दाखवले. हा फुगवटा सामान्यतः ६ ते ७ मिमी एवढा असतो. आणि यामध्ये पेशंट च्या दगावण्याची ५०% शक्यता असते. पण या केसमध्ये हा फुगवटा १०.५ से.मी.एवढा मोठा होता. रुग्णाच्या मेंदुपासून अक्कल दाढे पर्यंत त्याची व्याप्ती वाढली होती. त्यामुळे त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्तप्रवाह सुरू झाला होता. हाताच्या शिरेचा तुकडा वापरून बायपास पद्धतीने गळ्याच्या त्वचेखालून मेंदूपर्यंत शिर जोडून मेंदूला जाणारा रक्तपुरवठा सुरू ठेवण्यात आला. त्यानंतर फुगवटा असणारी शिर दोन्ही टोकाकडून बंद करण्यात आली. तब्बल ११ तास अखंडपणे शस्त्रक्रिया करून डॉ. शिवशंकर मरजक्के सर यांनी रुग्णाचा जीव वाचवला. यामध्ये न्युरो भूलतज्ज्ञ डॉ. प्रकाश भरमगोंडर , हार्ट सर्जन डॉ. अमोल भोजे यांनी मोलाचे योगदान दिले. शक्यतो मेट्रो सिटीमध्ये असणाऱ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये अशा शस्त्रक्रिया होतात. भारतात अशा हॉस्पिटलची संख्या ७ ते ८ आहे. पण कणेरी मठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटल हे भारतातील एकमेव ग्रामीण भागात असणारे हॉस्पिटल आहे.
येथे असणारी अत्तुच्य ऑपरेशन मशिनरी ज्याची किंमत ५ ते ६ करोड इतकी आहे. मेंदुवरील सर्व शस्त्रक्रिया, भुलतज्ञ स्पेशालिस्ट, न्युरो सर्जरीसाठी प्रशिक्षित स्टाफ या वैशिष्ठ्यमुळे सुमारे ४००, ते ५०० किलोमीटरवरील पेशंट अशा शस्त्रक्रियेसाठी सिध्दगिरी हॉस्पिटलला प्राधान्य देतात. डॉ. शिवशंकर मरजक्के सर डबल गोल्ड मेडलिस्ट असून,१२ हजारपेक्षा ही जास्त शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या असून, मेंदूच्या फुगवट्याच्या शस्त्रक्रियामध्ये त्यांचा हातखंडा आहे. भारतामध्ये या प्रकारच्या तसेच अपस्मार (epilepsy), इंडोस्कोपी अशा शस्त्रक्रिया करणारे केवळ १५ ते २० सेंटर आहेत. फक्त मेंदूच नाही तर हार्ट, कॅन्सर, किडनी, प्लास्टिक सर्जरी, डेंटल सर्जरी, स्त्री रोग यावर देखील येथे माफक दरात शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा आय सी यू केअर सेंटर असून आयुर्वेदिक उपचारासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे.
श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ संचलित सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, १२ वर्षापासून विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, सर्वसामान्यांसाठी एक आरोग्यसेवा म्हणून अगदी माफक दरामध्ये करत आले आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या १७ एकर परिसरामध्ये आणि स्वामीजींच्या अध्यात्मिक सहवासात सिद्धगिरी हॉस्पिटलच्या यशाचा आलेख इतर कोणत्याही हॉस्पिटलच्या तुलनेत उजवा ठरत आहे. याचा लाभ लोकांनी घ्यावा, असे आवाहन काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर आणि न्यूरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक व आभार श्री. विवेक सिद्ध यांनी मांडले. तसेच यावेळी श्री. राजेश कदम, श्री. राजेंद्र शिंदे, श्री. कुमार चव्हाण यांच्यासह सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.