Tuesday , September 17 2024
Breaking News

संभाजीराजे छत्रपतींना पोलंड सरकारकडून मुख्य अतिथी म्हणून आमंत्रण

Spread the love

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांना ३ ते ६ जुलै २०२२ या कालावधीत पोलंड देशाची राजधानी वॉर्सा येथे होणाऱ्या विशेष सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत भारत सरकार व पोलंड सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दोन राष्ट्रांतील संबंध वृद्धींगत करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती हे पत्नी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती आणि चिरंजीव युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांना पोलंड सरकारने वॉर्सा येथे चार दिवसीय अधिकृत भेटीसाठी आमंत्रित केले आहे. यावर्षीच मे महिन्यात संभाजीराजे यांना पोलंड सरकारने ‘द बेने मेरिटो’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने वळिवडे (कोल्हापूर) येथे छावणी उभारून ५००० पोलिश निर्वासितांना आश्रय दिला होता. १९४२ ते १९४९ दरम्यान याठिकाणी वास्तव्य केलेल्या या पोलिश कुटुंबांच्या आणि व्यक्तींच्या स्मरणार्थ छत्रपती संभाजीराजे यांच्या पुढाकाराने १२ सप्टेंबर २०१९ रोजी संग्रहालयाची पायाभरणी आणि स्मृतिस्तंभाची उभारणी पोलंडचे मार्सिन प्रझिडाक आणि भारतातील पोलंडचे राजदूत अ‍ॅडम बुराकोव्स्की यांच्या हस्ते करण्यात आले होते.
संभाजीराजे छत्रपती हे ओकोटा येथील गुड महाराजा स्क्वेअरला भेट देतील, जिथे त्यांचे स्वागत ओकोटा जिल्ह्याच्या महापौर सुश्री डोरोटा स्टेगिएन्का आणि स्मारकाची देखरेख करणार्‍या जानुस कॉर्झाक लिसियम शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक करतील. संभाजीराजे छत्रपती यांची मुलाखत पावेल लेपकोव्स्की, ऐतिहासिक संपादक आणि बोगस्लाव क्राबोटा, मुख्य संपादक, रझेझपोस्टपोलिटा, पोलंडचे प्रमुख दैनिक वृत्तपत्र घेणार आहेत.
यानंतर वॉर्सा रायझिंग म्युझियमला संभाजीराजे भेट देतील आणि या दौऱ्याची सांगता ओल्ड ऑरेंजरी, रॉयल लेझिएन्की पार्क येथे एका भव्य सोहळ्याने होईल जिथे “रिमेमरिंग द गुड महाराजाज” या नावाने एक समारंभ आयोजित केला जाईल, या समारंभास संभाजीराजे छत्रपती, डॉ. पियुषकुमार मटालिया, नवानगरच्या जामसाहेबांचे प्रतिनिधी, आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि श्री. पिओटर ग्लिंस्की, उपपंतप्रधान आणि पोलंड प्रजासत्ताकचे सांस्कृतिक मंत्री उपस्थित राहणार आहेत. पोलंडचे लोक त्यांचे लाडके युवराज संभाजीराजे छत्रपती यांना येथे भेटण्यासाठी उत्सुक आहेत, ज्यांनी वैयक्तिकरित्या पुढाकार घेवून 2019 साली वळीवडे कॅम्पमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात राहिलेल्या व सध्या हयात असलेल्या पोलिश निर्वासितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वळिवडे (कोल्हापूर) येथे आमंत्रित करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.

About Belgaum Varta

Check Also

विनायक नगर येथे दुचाकी जाळण्याचा प्रकार

Spread the love  बेळगाव : विनायक नगर येथे सोमवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास घरासमोर लावण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *