मुंबई : राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यावरून बराच गोंधळ झाला. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत अनलॉक प्रक्रियेची घोषणा केली. पण नंतर युटर्न घेत प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सांगितल्यानं सरकारच्या कारभारावर टीका सुरु झाली होती. अखेर पाच टप्प्यात अनलॉक प्रक्रिया सोमवारपासून सुरु होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी रेटनुसार निर्बंध शिथिल केले जाणार आहेत.
गेल्या आठवड्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार ऑक्सिजन बेड भरलेली संख्या आणि पॉझिटिव्हीटी रेट यांच्या आधारे जिल्हा प्रशासन स्वतंत्र आदेश काढेल. मात्र या दोन निकषांनुसार अनलॉक प्रक्रिया कशी असणार आहे हे राज्य सरकारने सांगितलं आहे. प्रत्येक आठवड्यात दोन निकषांच्या आधारे जिल्ह्यांची वर्गवारी करून निर्बंध शिथिल करण्याचा किंवा ते कडक करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यांमध्ये मॉल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांसाठी वेळेचं बंधन नसेल. तर दुसऱ्या टप्प्यात यासाठी 50 टक्केच उपस्थितीची अट असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र, सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील. तर चौथ्या टप्प्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील आणि इतर दुकाने बंद राहतील. पाचव्या टप्प्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 4 पर्यंतच सुरू राहतील. या ठिकाणी वीकेंड लॉकडाऊन लागू असेल. जिल्ह्याच्या आकडेवारीनुसार जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात येतील.
Check Also
भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर
Spread the love मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …