नागपूर : एकनाथ शिंदे भाजप सरकारचा खाते वाटपाचा कोणताही फार्म्युला ठरलेला नाही. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर बोलताना दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर फडणवीस आज (दि.५) नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यातील सत्तांतर आणि १८ जुलै रोजी होणारे पावसाळी अधिवेशन राष्ट्रपती निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. अधिवेशनाची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. तत्पूर्वी मंत्रीमंडळ स्थापन करण्याचे प्रयत्न राहील. राज्यात सध्या अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ लवकर स्थापन होऊन मदतीचे ठोस निर्णय घेण्यात येतील.
सत्तेच्या खेळात सामान्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी खंत राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विशेष अधिवेशनात बोलताना व्यक्त केली होती. याकडे लक्ष वेधले असता फडणवीस यांनी लवकरच मंत्रिमंडळ स्थापन करू असेही सांगितले.
११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. विदर्भाचा आम्ही यापूर्वीही विकास केला आहे. आताही अनुशेष दूर करू, असेही ते म्हणाले.
विमानतळापासून ते फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत रॅली काढण्यात आली. रस्त्यात ठिकठिकाणी स्वागताचे पोस्टर, बॅनर कमानी लावण्यात आल्या. काही पोस्टर वर देवेन्द्र फडणवीस यांचा देवमाणूस म्हणूनही उल्लेख करण्यात आला. राज्यसभा निवडणुकीसाठी मुंबईला रवाना झाल्यानंतर थेट उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी नागपुरात आले. त्यानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोलताशांच्या दणदणाटात जंगी स्वागत केले. या निमित्ताने विमानतळ ते त्रिकोणी पार्क या त्यांच्या घरापर्यत बाईक तसेच कार रॅली काढण्यात आली. रॅलीचा संपूर्ण मार्ग भगवे झेंडे व पताका लावून भगवामय करण्यात आला होता.