मुंबई : राज्यात युतीचं सरकार स्थापन झाल्यावर खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपाची साथ मिळाल्यानंतर आता शिंदेसेनेला महत्त्वाची खाती मिळणार असा अंदाज बंडखोर आमदारांना होता. मात्र सत्तावाटपामध्ये भाजपचाच वरचष्मा राहण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. कारण महत्त्वाची मलईदार खाती भाजपामध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. नव्या सरकारमध्ये शिंदे गटाकडं १३ आणि भाजपकडं २५ मंत्रिपदे राहणार आहेत.
एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा दोन टप्यात होणार आहे. यामध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी पहिला आणि निवडणुकीनंतर दुसरा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे गृह, अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा अशी मलईदार खाती भाजपकडे जाणार असून नगरविकास, परिवहन, शिक्षण अशी खाती शिंदे गटाला मिळणार आहेत.
असे असेल खातेवाटप
गृह, अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, उच्च आणि तंत्रशिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, ओबीसी विकास ही विकासाभिमुख आणि मोठी आर्थिक तरतूद असणारी खाती भाजपकडे असतील.
मुख्यमंत्री शिंदे गटाकडे नगरविकास, खाणकाम, परिवहन, पर्यावरण, रोजगार हमी, फलोत्पादन, शालेय शिक्षण, मृद व जलसंधारण, उद्योग आदी क्षेत्रे मिळण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta