मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्य बाण’वर बंडखोर गटाकडून दावा करण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेकडून निवडणूक चिन्ह कायम ठेवण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे वृत्त समोर आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक चिन्हाबाबत स्पष्टपणे भाष्य केले आहे. ‘धनुष्य बाण’ हे निवडणूक चिन्ह शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि रस्त्यावर संघर्ष करणारा पक्ष वेगळा आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे उद्धव यांनी म्हटले.
मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या धनुष्य बाण या निवडणूक चिन्हाचे काय होणार, याबाबत वेगवेगळ्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यातच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना नवीन निवडणूक चिन्ह कमी कालावधीत लोकांपर्यंत घेऊन जाण्याची तयारी करावी असे वक्तव्य केले असल्याचे समोर आले होते. त्यानंतर शिवसैनिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे ‘धनुष्य बाण’ कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे मी ठामपणे सांगत आहे. आम्ही घटनातज्ज्ञ, कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून हे वक्तव्य करत असल्याचे उद्धव यांनी म्हटले. मतदान करताना ‘धनुष्य बाण’ कोणी हाती घेतलाय याचाही लोक विचार करतात असे शिवसैनिकांशी संवाद साधताना म्हटले होते, असेही उद्धव यांनी सांगितले. पक्षाचे निवडणूक चिन्ह हिरावून घेणे सोपं नसल्याचेही त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta