मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. यावरून विरोधकांकडून भाजपावर जोरदार टीका सुरू आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार विनायक राऊत यांनी भाजपा आणि शिंदे सरकारवर टीका केली.
विनायक राऊत म्हणाले, दुर्दैवाने कालच शिवसेना नेते संजय राऊत यांना पुन्हा कर्नाटकच्या कोर्टाने नोटीस पाठवली आहे. पाच वर्षांपूर्वी एक सभेत भाषण केलं, त्याचा संदर्भ आता काढला आणि भडकाऊ भाषण दिल्याबद्दल त्यांना समन्स पाठवलेलं आहे. केवळ महाराष्ट्रावर सूड उगवण्याचं काम भाजपाकडून सुरू आहे. त्यातूनच कर्नाटकातील लोकांचे उपद्वव्याप आता खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. शिवसेना मात्र कोणत्याही परिस्थितीत गप्प बसणार नाही. कर्नाटकची नाकेबंदी करण्याची जबरदस्त ताकद शिवसेनेत आहे, वेळ पडली तर तेही केल्याशिवाय राहणार नाही.
याशिवाय पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांची मुक्तता करत असताना, ईडीवर ज्या पद्धतीने ताशेरे ओढलेले आहेत. त्याचा सूड उगवण्यासाठी पुन्हा एकदा संजय राऊत यांना तुरुंगात टाकण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या भाजपाकडून आखल्या जात आहेत. असा आरोपही विनायक राऊत यांनी भाजपावर यावेळी केला.
Belgaum Varta Belgaum Varta