मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली आहे. दाखल केलेल्या अर्जावर 16 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. राजकीय हेतूने अटक होण्याची शक्यता असल्याचा अटकपूर्व जामीन अर्जात उल्लेख करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने मुश्रीफांवर कथित गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या नाविद, आबिद आणि साजिद मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला आहे. अर्जातून राजकीय हेतूनं अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, ईडीकडून आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर 35 कोटी रुपयांच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हसन मुश्रीफांवर 21 दिवसांत दोनदा छापेमारी
दरम्यान, हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी 11 जानेवारी रोजी ईडीने छापेमारी केली होती. या तीन ठिकाणांसह मुश्रीफ यांच्या कन्येच्या कोल्हापुरातील सासने मैदान परिसरातील घरावरही छापा टाकण्यात आला. 11 जानेवारी रोजीच ईडीकडून पुण्यातही मुश्रीफ यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले होते. त्यामध्ये शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअर समोर पेट्रोल पंपामागे इमारतीमधील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक, तसेच साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्कमध्ये राहणारे व्यावसायिक भागीदार यांच्यावर छाप्याची कारवाई केली होती.
कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडीची छापेमारी
या छापेमारीनंतर 21 दिवसांनी 1 फेब्रुवारी रोजी आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील जिल्हा बँकेची शाखा, तसेच गडहिंग्लज तालुक्यातील हरळीमधील ‘गोडसाखर’ला (अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना) लागून असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेवरही छापेमारी केली होती. यावेळी तब्बल 30 तास छापेमारी केल्यानंतर बँकेच्या पाच अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेत मुंबईला नेऊन चौकशी केली होती. ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांची 70 तासांनी ईडीने सुटका केली होती.
ईडीने तब्बल कोल्हापुरातील 30 तासांच्या छापेमारीत ब्रिक्स व संताजी घोरपडे साखर कारखान्याची संबंधित सर्व व्यवहारांची कसून चौकशी केली होती. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी माने, पत देखरेख विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहाय्यक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर आणि राजू खाडे यांना समाज बजावून ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले होते. या छापेमारीत सरसेनापती संताजी घोरपडे, ब्रिक्स, बिद्री व भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारांबाबत चौकशी झाल्याची माहिती आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून कर्ज प्रकरणाबाबत माहिती घेऊन चौकशी करण्यात आली. कापशी शाखेतील सर्व शेतकरी ठेव पावत्यांची झेरॉक्स प्रत घेतल्याची माहिती आहे.
Belgaum Varta Belgaum Varta