मुंबई : अजित पवारांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली आहे. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचं पक्षचिन्ह आणि नाव यावरून दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं विधान केलं आहे.
अपात्रतेची याचिका दाखल केलेले आमदार वगळता सर्व आमदार शरद पवार गटाकडे आहेत, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटल्याने विरोधी पक्षनेता कोणत्या पक्षाचा असणार? असा प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, विरोधी पक्षनेता राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच कायम राहणार आहे. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या ४५ आहे. आम्ही नऊ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यांना निलंबित केलं आहे. ते नऊ आमदार सोडून बाकी सर्व आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहेत.
पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना आव्हाड पुढे म्हणाले, आमच्याविरोधात जो फुटीर गट आहे. तो निवडणूक आयोगाकडे गेला आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो नाही. कारण आम्ही मूळ पक्ष आहोत. आमच्याकडे पक्षाचं संविधान आहे. हे मूळ संविधान आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत.
३ जुलैला अजित पवार गटाची पत्रकार परिषद झाली होती. त्यामध्ये प्रत्येक नेत्याने सांगितलं की, शरद पवार आमचे दैवत आहेत. शरद पवार आमचे विठ्ठल आहेत. शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सगळ्या नेत्यांनी हे ३ जुलैला बोललं आहे. आता तेच नेते म्हणतायत की, आम्ही ३० तारखेलाच निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं होतं. या सर्व मॅनेजमेंटच्या बाबी आहेत, असंही आव्हाड पुढे म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta