
मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते. दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करु, असे त्यांनी सांगितलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात असल्याचं वक्तव्य केले होते. आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी भाजपच्या कार्यलयात जय्यत तयारी सुरु आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता अशोक चव्हाण यांचा भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश होणार आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर हे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.
अशोक चव्हाण यांना राज्यसभा
अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कारण, अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आधी 15 फेब्रुवारी रोजी होणार होता. पण अचानक घाईघाईमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश होत आहे. राज्यसभेसाठी नामंकन देण्याची अखेरची तारीख एका दिवसावर आली आहे, त्यामुळे राज्यसभेवर जाण्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.
भाजप कार्यालयात चव्हाणांच्या पक्षप्रवेशाची तयारी, तिकडे काँग्रेसची खलबतं
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आणि काँग्रेस आमदार फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता गांधी भवन (तन्ना हाऊस) कुलाबा, मुंबई येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते देवरा, सिद्दीकी आणि आता चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला फटका मानला जातोय. चव्हाण यांच्यासह सध्या अनेक काँग्रेसचे आमदार पक्ष सोडण्याचा मार्गांवर असल्याने डॅमेज कंट्रोलसाठी आज महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक होतेय.
Belgaum Varta Belgaum Varta