नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत चंद्रकांत हांडोरे यांचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, चंद्रकांत हांडोरे यांचा गेल्या राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला होता. याच मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली होती. अशातच आता पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींनी चंद्रकांत हांडोरेंवर विश्वास दाखवत त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.
चंद्रकांत हांडोरे आगामी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे महाराष्ट्रातून उमेदवार असतील. काँग्रेसनं यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकच उमेदवार दिला आहे. याचाच अर्थ स्पष्ट होतंय की, आता भाजप आणि मित्रपक्षांकडून यंदा महाराष्ट्रासाठी पाच उमेदवार दिले जाऊ शकतात. म्हणजे, काँग्रेसनं भाजप आणि मित्रपक्षांचे पाचही उमेदवार निवडून येतील, हे कुठे ना कुठे मान्य केलं आहे, असं स्पष्ट होत आहे.
काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून त्या राज्यसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. काँग्रेसकडून राज्यसभेची यादी जाहीर करण्यात आली आहे. सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत. याव्यतिरिक्त बिहारमधून अखिलेशप्रताप सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंघवी यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. यासोबतच काँग्रेस महाराष्ट्रात विधानसभेची एकच जागा लढवणार आहे, हे आता स्पष्ट झालं आहे.