
मुंबई : भाजपाने राज्यसभा उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देऊ केली आहे. तर ज्यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती, त्या पकंजा मुंडेंना मात्र यावेळी वगळण्यात आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कालच (१३ फेब्रुवारी) भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याचबरोबर कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना २०१९ मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्या काहीशा नाराज होत्या. त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडेही आपली तक्रार नोंदविली होती. आज राज्यसभेसाठी त्यांना उमेदवारी देऊन भाजपाने एकप्रकारे त्यांचे पुर्नवसन केल्याचे दिसत आहे.
देशभर लोकसभा निवडणुकांचा माहौल असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार, २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत १५ फेब्रुवारी पर्यंत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आज गुजरात आणि महाराष्ट्रासाठी सात उमेदवारांची यादी जाहीर केली. महाराष्ट्रातून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन आणि प्रकाश जावडेकर हे तीन जण निवृत्त होत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta