लातूर : मराठ्यांची लोकसंख्या कमी दाखवली जातेय, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा वापर करुन पुन्हा काही केलं, तर एकत्र यावं लागेल, असं थेट आव्हानंही मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना केलं आहे.
मंगळवारी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. बैठक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या भूमिकेमुळे समाज एकवटला आहे. त्यांना आता सुट्टी देणार नाही. तसेच, येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करणार असा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.
फडणवीसांना सुट्टी नाही, समाज एकवटलाय : मनोज जरांगे
मराठा आंदोलक मनोज जरांगे बोलताना म्हणाले की, मी समाजाचा माणूस आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, बच्चू कडू, प्रकाश आंबेडकर यांचा माणूस आहे, असे आरोप माझ्यावर सातत्यानं होत आहेत. मात्र, मी फक्त समाजाचा आहे. मी कोणाचं ऐकत नसतो. शरद पवार जर आरक्षणाच्या विरोधात बोलले, तर उद्यापासून मी त्यांचाही विरोध करेल. देवेंद्र फडणवीस यांच्या वागणुकीमुळे समाज मोठ्या प्रमाणात एकत्र आला आहे. त्यांच्यासाठी हे आता जड जाणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
शरद पवार मराठा आरक्षणाविरोधात बोलले, तर त्यांच्याही विरोधात बोलणार : मनोज जरांगे
तुम्ही शरद पवार यांचे माणूस आहे असा आरोप होत असतो याबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, शरद पवार उद्या जर मराठा आरक्षणाविरोधात बोलले तर त्यांच्याही विरोधात बोलीन मी. ही संवाद बैठक आहे. लोक एकत्र झाले आहेत. आता त्याचा राजकीय फटका सगळ्यांना बसेल, असं मनोज जरांगे म्हणाले. मला गरज नाही पोलिसांची माझी जात सज्ज आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले.
दरम्यान, मराठा आमदार मंत्री हे पक्षाचे काम करतायत. जातीच्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार का नाही? हे पहाणार आहे समाज. हजारो लोक लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यात येत आहे, हा समाजाचा विषय तो माझा नाही. त्यांना अधिकार आहे. पाच पन्नास लोक उभे राहतील, त्यांचं भविष्य त्यांच्या हातात आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले.