पुणे : साहित्यिक प्रेम वाटतो, जाणिवा विकसित करतो; पण आजच्या साहित्यिकातील लेखक असंवेदनशील झाला असून, ही अराजकतेची सुरुवात आहे. भयामध्ये वावरणारा सामान्य माणूस आणि समाज आतला आवाज गमावून बसला आहे. लोक नको त्याचे समर्थन करू लागल्याने वैचारिक गोंधळ निर्माण झाला आहे. विचारवंत स्पष्ट बोलत नाहीत. साहित्यिक ताठ मानाने उभे नाहीत. लेखक आणि कलावंतांची मुस्कटदाबी होत राहिली, तर हा देश पराभूत व्हायला वेळ लागणार नाही, अशा परखड शब्दांत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांनी साहित्य क्षेत्रातील स्थितीवर गुरुवारी भाष्य केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. कसबे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी डॉ. कसबे यांनी सध्याच्या साहित्यक्षेत्रातील स्थितीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत कोणीच कोणाचे ऐकत नाही आणि कोणी इतरांना समजून सांगण्याच्या भानगडीत पडत नाही, अशा अराजक स्थितीत देश पोहोचला आहे. देशात जाती आणि वर्ग युद्ध सुरू झाले आहे. साहित्यिक आणि कलावंत भीती आणि संभ्रमात आहेत. देशात वाट्टेल ते बोलण्याचे स्वातंत्र्य आहे; पण सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. विचारवंतांना नक्षलवादी ठरवून तुरुंगात डांबले जात आहे. शेतकर्यांना, कामगारांना आपल्या हक्कासाठी सतत रस्त्यावर उतरावे लागत आहे.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेने निरुपयोगी केलेला सामान्य माणूस समाज आणि देशापासून तुटला आहे. इंद्रधनुष्यासारखा अनेक रंगांचा मिलाफ असलेल्या देशाचे सौंदर्य टिकवले पाहिजे. धर्म, तत्त्वज्ञान आणि प्राचीन परंपरेच्या अहंकाराखाली वैविध्यपूर्ण जीवनशैलीची मोडतोड करण्याऐवजी एकमेकांच्या जीवनशैलीचा आणि खानपान-संस्कृतीचा आदर केला पाहिजे. संस्कृती महान असतानाही केवळ राज्यघटनेमुळे एकसंध राष्ट्र झालेल्या देशाची राज्यघटना आज धोक्यात सापडली आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Check Also
भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर
Spread the love मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …