मुंबई : जळगावमधील एरंडोल तालुक्यातील खेडी येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खेडी गावाजवळील एका शेतात या पाचही जणांचे मृतदेह आढळले आहेत. शेताकडे जात असताना विजेचा धक्का लागल्याने या सर्वांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण शेतात काम करण्यासाठी जात होते. त्यावेळी विजेचा धक्का लागून या सर्वांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत ४० वर्षांच्या दोन महिला, ४५ वर्षांचा एक पुरुष, सहा वर्षांची एक मुलगी आणि आठ वर्षांचा एक मुलगा अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाले. हे कुटुंब आदिवासी पावरा समाजाचे होते अशी माहिती समोर आली आहे. या भीषण घटनेतून याच कुटुंबातील तीन वर्षांची एक मुलगी सुखरूप बचावली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या मृतांची नावे निष्पन्न करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta