Monday , December 8 2025
Breaking News

भारताकडून पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त

Spread the love

 

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारतानं सुरू केलेलं ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं. त्याच्या काही तासांत संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनामध्ये भारतीय लष्करानं थेट पाकिस्तानच्या लाहोरजवळील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या कारवायांना जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा स्पष्ट इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

गुरुवारी सकाळच्या कारवाईत पाकिस्तानात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या एअर डिफेन्स रडार सिस्टीमला भारतीय हवाई दलाने लक्ष्य केल्याची माहिती या निवेदनात देण्यात आली आहे. “पाकिस्तान ज्या प्रकारे कारवाई करेल, त्याच पद्धतीने भारताकडून उत्तर दिले जाईल. अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे की लाहोरजवळील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त झाली आहे”, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

७ तारखेच्या पत्रकार परिषदेची करून दिली आठवण
दरम्यान, या निवेदनात भारताला ही कारवाई का करावी लागली, यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे. “७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने हे स्पष्ट केले होते की आमची कारवाई ही पूर्णपणे दहशतवादी तळांवर केंद्रीत असून कोणत्याही लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यात आलेला नाही. त्याचवेळी भारतीय लष्करानं स्पष्ट केलं होतं की भारतात लष्करी ठिकाणांवर कोणत्याही प्रकारे हल्ला केल्यास त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल”, अशा शब्दांत या निवेदनातून भूमिका मांडण्यात आली आहे.

“७ आणि ८ मे च्या मध्यरात्री पाकिस्तानकडून उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्याचे प्रयत्न झाले. त्यात अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कापुरथला, जलंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या १५ शहरांचा समावेश आहे. पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हे हल्ले करण्यात आले. इंटीग्रेटेड काऊंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टीमच्या मदतीने पाकिस्तानचे हे प्रयत्न हाणून पाडण्यात आले. हे पाकिस्तानचेच हल्ले असल्याचं या ड्रोन व क्षेपणास्त्रांच्या अवशेषांवरून स्पष्ट होत आहे”, अशी माहिती या निवेदनात देण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *