
नवी दिल्ली : दिल्लीच्या दक्षिण-पूर्व भागातील जैतपूर येथील हरी नगर परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हरी नगर परिसरातील एका जुन्या मंदिराची भिंत कोसळली आहे. भिंत कोसळल्यामुळे ८ जण ढिगाऱ्याखाली दबले, त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला असून यात एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या मंदिरातील भिंत कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली लोक दबले गेले. भिंत पडल्यानंतर आवाज इतका मोठा आला की, आजूबाजूच्या घरांमधील लोक घाबरले. सध्या अग्निशमन दलाकडून ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.
हरी नगरमधील भिंत कोसळण्याच्या घटनेबद्दल अतिरिक्त डीसीपी ऐश्वर्या शर्मा यांनी सांगितले की, ‘या परिसरात एक जुनं मंदिर आहे. त्याच्या शेजारी जुन्या झोपडपट्ट्या आहेत. जिथे भंगार विक्रेते राहतात. रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस बरसत होता. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली. या भिंतीखाली ८ लोक अडकले होते. बचाव पथकानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले’. ‘तसेच रूग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. ३-४ लोक गंभीर जखमी आहेत. भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून आम्ही आता या झोपडपट्ट्या रिकाम्या केल्या आहेत’, असं ते म्हणाले.
प्राथमिक माहितीनुसार, इमारत जुनी होती. बांधकामातीली त्रुटींमुळे भिंत कोसळली असावी, अशी माहिती आहे. प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta