मुंबई : ईडीच्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं समोर आलंय. दाऊदचा भाचा आणि हसिना पारकरचा मुलगा अलीशाह पारकरने ईडीसमोर ही कबुली दिलीय. ईडी मनी लाँडरिंग प्रकरणी तपास करत आहे. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान अलीशाह पारकरचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.
अलीशाह पारकरने ईडीला सांगितलं, दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराचीत आहे. मात्र, माझा दाऊदसोबत कोणताही संपर्क नाही. मात्र, दाऊदची बायको महजबीनने सणांच्या काळात माझ्या बायकोशी आणि बहिणीशी संपर्क केला होता. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट केलं आहे.
दाऊद कनेक्शनवरून राज्यातील राजकारणाचा पारा चढला
दरम्यान, मागील काळात अनेकदा राजकारण्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप झालेत. यात शरद पवारांपासून अनेकांवर हे आरोप झाले. आता असेच आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर झालेत. विशेष म्हणजे यावेळी केवळ आरोपच झाले असे नाही, तर विशेष न्यायालयाने ईडीने सादर केलेल्या पुराव्यांवरून प्रथमदर्शनी मलिकांचे दाऊद कंपनीशी संबंध असल्याचं निरिक्षण नोंदवलं. यानंतर भाजपाने राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली. या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर देखील दिलं.
Belgaum Varta Belgaum Varta