नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी (18 जुलै) मतदान होणार आहे. मतदानापूर्वी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत. अधिक पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. अशात दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचा पाठिंबा विरोधी पक्षांना मिळाला आहे. ही विरोधकासाठी आनंदाची बातमी आली.
आम आदमी पक्षाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी शनिवारी (ता. 15) यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आम्ही एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा आदर करतो. परंतु, यशवंत सिन्हा यांच्या बाजूने मतदान करू, असे संजय सिंह म्हणाले.
झारखंड मुक्ती मोर्चा आणि बिजू जनता दल या पक्षांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर यशवंत सिन्हा यांना आम आदमी पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. एनडीएमध्ये सहभागी पक्षांव्यतिरिक्त सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, बहुजन समाज पार्टी, वायएसआर काँग्रेस, टीडीपी, जनता दल (एस), शिरोमणी अकाली दल, यूडीपी यांनीही एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
आप हा एकमेव बिगर-भाजपा, बिगर-काँग्रेस पक्ष आहे ज्याची सरकारे दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यात आहेत. आपचे दोन्ही राज्यांतून 10 राज्यसभा खासदार आहेत. त्यापैकी तीन दिल्लीचे आहेत. तसेच पक्षाचे पंजाबमध्ये 92, दिल्लीत 62 आणि गोव्यात दोन आमदार आहेत.