पणजी : टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सीबीआयचे पथक उद्या गोव्यात जाणार आहे. गोवा सरकारने सोनाली फोगट मृत्यू प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली होती. त्यानंतर सोमवारी गृह मंत्रालयाने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी डीओपीटी मंत्रालयाला पत्र लिहिले. सोनाली फोगाट यांच्या मृत्यूच्या सुरुवातीपासूनच त्यांचे कुटुंबीय सीबीआय चौकशीची मागणी करत होते. यासाठी त्यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेऊन लेखी अर्ज दिला होता. त्यानंतर हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी पत्र लिहिले होते.
दोन दिवसांपूर्वी सोनाली फोगाट यांची बहीण रुकेश यांनी सीबीआय चौकशीच्या मागणीचा पुनरुच्चार करताना आपल्या बहिणीच्या संशयास्पद मृत्यूमागे राजकीय कारण असल्याचा संशयही व्यक्त केला होता. एएनआयशी बोलताना त्या म्हणाल्या आहेत की, “सीबीआयच्या तपासानंतरच सत्य बाहेर येईल. आम्ही गोवा पोलिसांच्या तपासावर समाधानी नाही. गोवा पोलिस या प्रकरणाचा तपास कोणत्या अँगलने करत आहेत. हत्येमागे काही बडे लोक असू शकतात. सोनालीची हत्या राजकीय कारणावरून झाली असावी, त्यामुळे तपास व्हायला हवा.”
या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी सरकारवर दबाव आणल्याबद्दल त्यांनी खाप पंचायतींचे आभार मानले. रुकेश म्हणाल्या की, “खाप पंचायतींनी पूर्ण सहकार्य केले आहे. खाप पंचायतींमुळे हरियाणा आणि गोवा सरकारवर दबाव आला आहे.” सोनाली फोगट याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी रविवारी हिसारमध्ये खाप महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते.
Belgaum Varta Belgaum Varta