नवी दिल्ली : नव्या वर्षाची सुरुवात महागाईच्या चटक्याने झाली आहे. इंधन कंपन्यांनी आज एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाहीर केले आहेत. प्रति सिलेंडरमागे 25 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरसाठी लागू करण्यात आली आहे. तर, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही. वाढत्या महागाईच्या काळात दिलासा देण्यासाठी एलपीजीचे दर कमी करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, सरकारकडून, इंधन कंपन्यांनी कोणताही दिलासा दिला नाही.
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच आजपासून 1 जानेवारी 2023 पासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे घरातील किचन बजेट बिघडणार नाही. मात्र, व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेल आदींतील खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात. एलपीजीचे नवे दर आजपासून लागू झाले आहेत.
व्यायावसायिक वापरासाठी असलेला एलपीजी सिलेंडर 19 किलोचा असतो. तर घरगुती वापरासाठी असलेला एलपीजी सिलेंडर हा 14.2 किलोंचा असतो. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही दरवाढ झाली नसली तरी सामान्य ग्राहकांना एका सिलेंडर मागे किमान एक हजार रुपये मोजावे लागतात. वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे किचन बजेट बिघडले आहे.
देशातील चार मेट्रो शहरात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर काय?
दिल्ली – 1769 रुपये प्रति सिलेंडर
मुंबई – 1721 रुपये प्रति सिलेंडर
कोलकाता – 1870 रुपये प्रति सिलेंडर
चेन्नई – 1917 रुपये प्रति सिलेंडर