दक्षिण फिलिपाइन्समध्ये गुरूवारी (दि. ३०) मोठी दुर्घटना घडली. २५० जणांना घेऊन जाणाऱ्या बोटीला अचानक आग लागल्याने ३१ जणांचा मृत्यू झाला तर, ७ जण बेपत्ता झाल्याची माहिती एपीएफ न्यूजने दिली आहे. बोटीला अचानक आग लागल्याने बोट बुडून ही दुर्घटना घडल्याचे फिलिपाइन्स प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
फिलिपाइन्स कोस्ट गार्ड्स (PCG) ने सांगितल्यानुसार, ही बोट २५० जणांची पॅसेंजर फेरी घेऊन दक्षिण फिलिपाइन्सच्या पाण्यातून जात असताना, बलुक-बलुक बेटाजवळ आग लागली. बलुक-बलुक बेट हे फिलीपाईन्सच्या बासिलान प्रांतात येते. झाम्बोआंगा येथील फिलिपाइन्स कोस्ट गार्ड (PCG) च्या म्हणण्यानुसार, आग विझवण्यात अनेक जलवाहिन्या गुंतल्या आहेत.
सातजण अजूनही बेपत्ता
बासिलानच्या दक्षिणेकडील बेटाचे गव्हर्नर जिम हातामन यांनी सांगितले की, आग लागल्याने काही लोकांनी घाबरून पाण्यात उड्या मारल्या. मात्र नौदल आणि मच्छिमारांसह इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. तर ७ जण अजूनही बेपत्ता आहेत, त्यांचा शोध घेतला जात आहे. जळालेली बोट बासिलानच्या किनाऱ्यावर आणल्याचे हातमन यांनी सांगितले. येथे बोटीच्या एका केबिनमधून १८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
बचावकार्य आणि तपास सुरू
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बोटीमध्ये लागलेल्या आगीचे कारण तपासले जात असल्याचे हातमन यांनी सांगितले. मात्र, बोटीवर अतिरिक्त प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे, मात्र त्यांची माहिती देण्यात आलेली नाही. ही बोट झांबोआंगा येथून सुलूमधील जोलो शहराकडे जात होती. आगीमुळे बोटीत गोंधळ सुरू असतानाच, काही लोकांनी घाबरून पाण्यात उड्या मारल्या. या अपघातात सुमारे २३ जण जखमी झाल्याचे येथील प्रशासनाने सांगितले आहे.