नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क येथील एका धक्कादायक घटनेमुळे संपुर्ण परिसर हादरुन गेला आहे. कारण शास्त्री पार्क येथील एकाच घरातील ६ लोकांचा डास मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉईलमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्यापैकी अनेकजण घरातील डास मारण्यासाठी किंवा त्यांना पळवण्यासाठी घरामध्ये कॉईल लावतात. पण याच कॉईलने सहा जणांचा जीव घेतल्याची भयंकर घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्री पार्क भागातील एकाच कुटुंबातील ६ जणांचे मृतदेह सापडले. हे सर्व लोक झोपेत असताना डासांपासून बचाव करण्यासाठी लावण्यात आलेल्या कॉईलमुळे तयार झालेला कार्बन मोनॉक्साईड शरिरात गेल्याने या लोकांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. याबाबतची माहिती दिल्लीतील शास्त्री पार्क येथील डीसीपींनी दिली आहे.
शुक्रवारी दिल्लीतील शास्त्री पार्क येथील एका कुटुंबातील सदस्य डास घालवणारे कॉईल लावून झोपले होते. या घरात रात्री आग लागल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं. शिवाय हे सर्वजण झोपेत असताना रात्रीच्या वेळी डासांची कॉइल गादीवर पडल्यामुळे आग लागली आणि विषारी धुरामुळे घरात अडकलेल्या सदस्यांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचं ईशान्य जिल्ह्याचे डीसीपी जॉय तिर्की यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. या घटनेत एकूण नऊ जणांचा समावेश होता, त्यापैकी दोघांवर उपचार सुरू असून एकाला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. या दुर्घटनेत चार पुरुष, एक महिला आणि एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta