बंगळुरू : बंगळूरु येथील सुप्रसिद्ध रामेश्वरम कॅफे स्फोटाप्रकरणी एनआयएने मोठी कारवाई केली आहे. या केसमध्ये पोलिसांनी एका भाजप कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी सुरु असून त्यांचं दोन संशयितांसोबत कनेक्शन असल्याचं बोललं जातंय.
एनआयएने भाजप कार्यकर्ता साई प्रसाद याला ताब्यात घेतलं आहे. साई प्रसादची चौकशी सुरु आहे. मागच्या आठवड्यात एनआयएने शिवमोगा येथे छापेमारी केली होती. यावेळी एका मोबाईल दुकानात आणि दोन संशयितांच्या घरांवर छापे टाकण्यात आलेले होतं.
आरोपीचं नाव मोबाईल दुकानात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं होतं, अशी माहिती आहे. साई प्रसाद हा भाजप कार्यकर्ता असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येतंय.
दरम्यान, आठवड्याभरापूर्वी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मुझम्मिल शरीफ याला एनएआयने अटक केलीय. एनआयए अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीफला पकडण्यासाठी कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये १८ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. शरीफ हा या प्रकरणातील मुख्य आरोपी हुसेनचा सहकारी आहे. दोघांनी मिळून हा स्फोट घडवून आणल्याचं समोर आलेलं होतं.
१ मार्च रोजी बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाला होता. या दुर्घटनेत एकूण १० जण जखमी झाले होते. एनआयएने ३ मार्च रोजी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. सध्या या प्रकरणात अब्दुल मतीन ताहा नावाचा आणखी एक सूत्रधार असून तो सध्या फरार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली होती.