Monday , December 8 2025
Breaking News

विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड

Spread the love

 

तेलंगणा : तेलंगणातल्या मंचेरियल जिल्ह्यातील एका मिशनरी शाळेवर हल्ला झाल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या धार्मिक पोशाखावर आक्षेप घेतल्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या त्यानंतर संतप्त जमावाने शाळेवर हल्ला केला आहे. जमावाने शाळेत तोडफोड केली, तसेच शाळेतील कर्मचाऱ्यांना जबर मारहाणही केली. संतप्त जमाव शाळेत घुसून तोडफोड करत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक, दोन शिक्षक आणि इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक भावना दुखावणे, धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये वाद निर्माण करणे या कलमांखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतरही हे प्रकरण शांत झालं नाही. मुख्याध्यापकाच्या कृतीमुळे संतापलेल्या पालकांनी मागणी केली की, शाळेने सर्वांची माफी मागावी.
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, हैदराबादपासून २५० किमी अंतरावर कन्नेपल्ली गावात ब्लेस्ड मदर तेरेसा नावाची मिशनरी शाळा आहे. मूळचे केरळचे रहिवासी असलेले जॅमन जोसेफ हे या शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम पाहतात. जोसेफ यांनी बुधवारी शाळेत काही मुलांना शाळेच्या गणवेशाऐवजी इतर कपड्यांमध्ये पाहिलं आणि त्यांना हे कपडे परिधान करण्यामागचं कारण विचारलं. त्यावर विद्यार्थ्यांनी सांगितलं की, ते २१ दिवस हनुमान दीक्षेचं (२१ दिवसांचे उपवास) पालन करत आहे. यावर जोसेफ यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावलं.
दरम्यान, या शाळेने भगवे कपडे परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारल्याची बातमी आसपासच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केले जाऊ लागले. मुख्याध्यापखांनी हिंदूंच्या धार्मिक पोशाखावर आक्षेप घेतल्याचे मेसेजेस व्हायरल झाले. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी थेट शाळेवर हल्ला केला. शाळेवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे. जमावाने ‘जय श्री राम’चा नारा देत शाळेच्या खिडक्या फोडल्या, बाकं, टेबल आणि खुर्च्या तोडल्या. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला रोखलं. तत्पूर्वी या जमावाने मुख्याध्यापकांना मारहाण केली तसेच त्यांच्या कपाळावर भगवा टिळा लावला.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *