निवडणूक आली की, निवडणूक लढविणाऱ्यांचा पुढाऱ्यांचा ओढा पक्ष कार्यलायकडे असतो. तिकीट मिळावे म्हणून ज्येष्ठ नेत्यांचे उंबरे झिजवले जातात. पण ओडिशामध्ये एक अजबच प्रसंग घडला. इथे पुरी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराने मिळालेले तिकीट पक्षाला परत केले आहे. सुचरिता मोहंती यांना काँग्रेसने तिकीट दिले, मात्र प्रचारासाठी पुरेसा निधी दिला नाही. मोहंती यांनी लोकवर्गणीतून पैसे जमा केले आणि प्रचारावरील खर्चही कमी केला, तरीही त्यांच्या आर्थिक अडचणी संपल्या नाहीत. पैसे नसल्यामुळे प्रभावी प्रचार करता येत नव्हता, त्यामुळे “मी निवडणुकीतून माघार घेत आहे”, असा ईमेल त्यांनी पक्षश्रेष्ठींना पाठविला.
मोहंती म्हणाल्या की, मला पक्षाने पैसे देण्यास असमर्थतता दर्शविली. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून कमजोर उमेदवार देण्यात आले आहेत. दुसरीकडे भाजपा आणि बीजेडी पक्ष पैशांच्या राशीवर उभे आहेत. संपत्ती-पैसा याचे बीभत्स प्रदर्शन सगळीकडे होत असताना मला अशा परिस्थितीत निवडणूक लढवायची इच्छा नाही. त्यामुळे मी माघार घेत आहे.
मला लोककेंद्रीत प्रचार करायचा आहे. थेट लोकांशी संपर्क साधण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. पण माझ्याकडे पुरेसा निधी नाही. तसेच पक्षानेही कोणती जबाबदारी घेतलेली नाही. भाजपा सरकारने आमच्या पक्षाला आर्थिक पंगू केले आहे. त्यामुळे खर्चावर निर्बंध आले आहेत, अशीही खंत मोहंती यांनी बोलून दाखविली. तसेच ३ मे रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस यांना पत्र पाठवून मोहंती यांनी पुरी मतदारसंघातील अवघड परिस्थिती कथन केली. पक्ष निधी देत नसल्यामुळे मी तिकीट परत देत आहे, असेही त्या म्हणाल्या.
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजोय कुमार यांच्यावरही मोहंती यांनी आरोप केले. त्या म्हणाल्या की, प्रदेशाध्यक्षांनी माझा खर्च मीच करावा, असे स्पष्टपणे सांगितले. मी एक पगारी नोकरदार आहे. मी व्यवसायाने पत्रकार असून १० वर्षांपूर्वी राजकारणात आले. पुरी मतदारसंघात प्रचार करण्यासाठी माझी जेवढी बचत होती, ती मी खर्च केली. विकासात्मक राजकारणासाठी लोकवर्गणीतून पैसे उभारण्याचाही मी प्रयत्न केला. पण मला लोकांकडूनही फारसा प्रतिसाद लाभलेला नाही. तसेच प्रचाराच्या खर्चावरही मी कात्री लावण्याचा प्रयत्न केला. पण काही शक्य झाले नाही.