भोंगीर (तेलंगणा) : लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द करुन अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि ओबीसी (ओबीसी) समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवू, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते गुरुवारी तेलंगणातील भोंगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते.
यावेळी अमित शाह यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेस पक्ष खोटे दावे करुन लोकसभा निवडणूक लढवायची आहे. पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आले तर ते आरक्षण संपवून टाकतील, असे काँग्रेस पक्ष सांगतो. गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशावर निर्विवादपणे राज्य केले आहे. पण त्यांनी आरक्षण संपवले नाही. याउलट काँग्रेस पक्षाने एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचे आरक्षण लुटून मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण दिले, असे अमित शाह यांनी म्हटले. भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेसने याठिकाणी मुस्लिमांना जे आरक्षण दिले आहे, ते रद्द करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. हे आरक्षण आम्ही एससी, एससी आणि ओबीसींना देऊ, असेही अमित शाह यांनी म्हटले.
2019 मध्ये तेलंगणात भाजपला लोकसभेच्या 4 जागांवर विजय मिळाला. यंदाच्या निवडणुकीत आम्ही 10 पेक्षा अधिक जागा जिंकू. या 10 जागांमुळे मोदी सरकार 400 पारचा टप्पा ओलांडणार आहे. त्यामुळे भाजपला 10 पेक्षा अधिक जागांवर विजयी करा. आम्ही सत्तेत आल्यानंतर मुस्लिमांचे आरक्षण रद्द करुन ते आरक्षण एससी, एसटी आणि ओबीसींना देऊ, असे अमित शाह यांनी सांगितले. अमित शाह यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
राहुल गांधींची गॅरंटी फार काळ टिकणार नाही: अमित शाह
भाजपच्या जाहीरनाम्यात ‘मोदी की गॅरंटी’चा उल्लेख आहे. पण राहुल गांधी यांनी जी आश्वासने दिली आहेत, ती जास्त काळ टिकणारी नाहीत. राहुल गांधी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि प्रत्येक शेतकरी कुटुंबाला 15 हजार रुपये देण्याची भाषा करतात. मात्र, यापैकी एकही आश्वासन ते पूर्ण करु शकत नाहीत, असे अमित शाह यांनी म्हटले.