आयपीएल २०२४ च्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सपाठोपाठ पंजाब किंग्ज संघाचं आव्हान संपुष्टात आलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाबवर ६० धावांनी खणखणीत विजय मिळवला. या विजयासह बंगळुरूने प्लेऑफ्स अर्थात बाद फेरीच्या आशा जिवंत राखल्या आहेत. मात्र, पंजाबसाठी प्लेऑफचा रस्ता बंद झाला आहे. विराट कोहलीची ९२ धावांची खेळी बंगळुरूच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. बंगळुरूने कोहलीच्या ९२ धावांच्या खेळीच्या बळावर २४१ धावांची मजल मारली. अशा प्रकारे बंगळुरूने दिलेल्या २४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा डाव १८१ धावांतच आटोपला.
गुणतालिकेत कोलकाता आणि राजस्थान प्रत्येकी १६ गुणांसह प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहेत. सनरायझर्स हैदराबादचा संघ १४ गुणांसह प्लेऑफसाठी संभाव्य आहे. चेन्नई, दिल्ली, लखनौ या तीन संघांचे १२ गुण झाले आहेत. प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरण्यासाठी या तीन संघात चुरस आहे. बंगळुरूच्या संघाचे आजच्या विजयासह १० गुण झाले आहेत. त्यांच्यासाठी प्लेऑफचा रस्ता कठीण आहे पण अशक्य नाही. मुंबई आणि पंजाब मात्र यांनी गाशा गुंडाळला आहे.
पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोहलीने सलामीवीराच्या भूमिकेत खेळताना ४७ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह ९२ धावांची मॅरेथॉन खेळी केली. रजत पाटीदारने २३ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांसह ५५ धावा करत त्याला चांगली साथ दिली. कॅमेरुन ग्रीनने २७ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावांची खेळी केली. फिनिशरच्या भूमिकेतील दिनेश कार्तिकने ७ चेंडूत १८ धावा केल्या आणि बंगळुरूने सव्वादोनशेचा टप्पा ओलांडला. पंजाबकडून हर्षल पटेलने ३ तर विदवथ कावेरप्पाने २ विकेट्स पटकावल्या.
पंजाबकडून रायली रुसोच्या ६१ धावांच्या खेळीचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. रुसोने २७ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ६१ धावांची वेगवान खेळी केली. शशांक सिंग (३७), जॉनी बेअरस्टो (२७) यांनी चांगली सुरुवात केली मात्र बंगळुरूने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. बंगळुरूकडून मोहम्मद सिराजने ३ तर स्वप्नील सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि करण शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. बंगळुरूने या सामन्यासाठी ग्लेन मॅक्सवेलऐवजी लॉकी फर्ग्युसनला संधी दिली तर पंजाबने कागिसो रबाडाऐवजी लायम लिव्हिंगस्टोनला संघात घेतलं होतं.
विराट कोहलीचे हुकले शतक
विराट कोहलीने ४७ चेंडूंत ७ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९२ धावा करून बाद झाला. त्याला अर्शदीप सिंगने रायली रुसोच्या हाती झेलबाद केले. विराटचे नववे शतक हुकले. मात्र, या खेळीत त्याने अनेक विक्रम केले. त्याने केएल राहुलच्या आयपीएल हंगामात सर्वाधिक ६०० हून अधिक धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी साधली. दोघांनीही प्रत्येकी चार वेळा अशी कामगिरी केली आहे. विराटने कॅमेरूनसोबत ९२ धावांची भागीदारी केली.