जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील जम्मू-पूंछ महामार्गावर अखनूर येथे प्रवासी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. गुरुवारी (दि. 30) घडलेल्या या दुर्घटनेत 21 प्रवाशांचा मृत्यू झाले असून 50 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
जम्मू जिल्हा दंडाधिकारी यांनी ट्विटरवर सांगितले की, ‘उत्तर प्रदेशातील हाथरस येथून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला जम्मूच्या अखनूरमधील तांडाजवळ अपघात झाला. बचाव कार्य सुरू आहे. ही बस यात्रेकरूंना घेऊन शिव खोरी येथे जात होती.चोकी चोरा परिसरातील वळणावर हा अपघात झाला आणि बस सुमारे 150 फूट खोल दरीत कोसळली.’
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. लोक ओरडू लागले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलीस, स्थानिक नागरिक, एसडीआरएफ, एनडीआरएफ यांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना जम्मूच्या अखनूर हॉस्पिटल आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडिया साईट एक्सवरून यावर भावना व्यक्त केली आहे. ‘जम्मूजवळील अखनूरमध्ये बस अपघातात लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. हे नुकसान शब्दात मांडता येणार नाही. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करते.’