तेऊरवाडी (एस. के. पाटील) : नेसरी ता. गडहिंग्लज येथे लोकनेते राजश्री शाहू महाराज यांच्या १४७ व्या जयंती निमित्त नजीर मालदार व प्रमोद मुरकुटे यांचा नेसरी शिवसेना शाखेच्या वतीने प्रामाणिकपणाबद्द्ल सत्कार करण्यात आला. नेसरी येथील कु. शिवराज मनोहर देसाई या युवकाचे कामावरून येताना ५००० रुपये एवढी रक्कम मसनाई मंदिर शेजारी हरवली होती. तो गाडीवरून जात असल्याने त्याच्या ते लक्षात आले नाही. यानंतर ती रक्कम नजीर मालदार व प्रमोद मुरकुटे यांना संध्याकाळच्या वेळेस सापडली. त्यांनी ती सर्व रक्कम प्रामाणिकपणे शिवराज देसाई या युवकाला परत दिली. कोरोनाच्या महामारीमध्ये कुठेतरी माणुसकी हरवत चालली असताना ह्या दोन नेसरी येथील व्यक्तींनी प्रामाणिकपणाचे दर्शन दाखवून नेसरीकरांची मान नक्कीच उंचावर नेली. त्यामुळे लोकनेते राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त नजीर मालदार व प्रमोद मुरकुटे यांचा सत्कार नेसरी शिवसेना शाखेच्यावतीने करण्यात आला. यावेळी विलास हल्याळी (माजी उपतालुका प्रमुख), प्रकाश शिवाजी मुरकुटे (नेसरी शिवसेना शहर प्रमुख), सागर अत्याळी, विश्वनाथ रेळेकर, जमीर जलाली, जुबेर वाटंगी, प्रसाद हल्याळी, अनिकेत नाईक, भागेश पांडव, शिवराज देसाई आदि मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta