ईसापूर, पारगड, वाघोत्रे भागांतील ग्रामस्थ हैराण
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यापासून कित्येक गावे नेटवर्कअभावी वंचित आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांची गैरसोय होऊन त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
ग्रामस्थांना व युवावर्गाला नेटवर्कअभावी कोणतीही खाजगी स्वरूपाची कामे होत नाहीत, अत्यावश्यक व एखादी आपत्ती ओढवल्यास बाहेर गावी व तालुक्याच्या ठिकाणी संपर्क होत नाही, दळण-वळण सुविधा सुरळीत नाहीत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण, क्लास घेता येत नाही, शासकीय कार्यालय व ग्रामपंचायतीमधे ऑनलाईन सेवा नसल्याने कागदपत्रांअभावी ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी पायपीट करावी लागते.
एकंदरीत, टॉवर नेटवर्कअभावी या भागातील ईसापूर, पारगड, वाघोत्रे भागांतील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. आजहीं हे ग्रामस्थ टॉवरसंदर्भात आशेचा नवा किरण आपल्या आयुष्यामध्ये घडून येईल या प्रतीक्षेमध्ये असताना मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष पहायला मिळत आहे.
त्यामुळे या सदर समस्येची दखल लवकरात लवकर जिल्हाप्रशासनाकडून घेण्यात यावी अशी मागणी येथील पारगडवाशी ग्रामस्थ व युवावर्गातून होत आहे.