शिरगुप्पी परिसरात धुवाधार पाऊस : लवकरच होणार तलाव ओव्हरफ्लो
निपाणी (संजय सूर्यवंशी ) : निपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावात चार दिवसापूर्वी 36 फुट 3 इंच इतकी पाणीपातळी होती. सदर पाणीसाठा दोन महिने पुरेल इतका होता. पण गेल्या दोन दिवसापासून निपाणी शहर आणि शिरगुप्पी डोंगर परिसरात दमदार पाऊस होत आहे त्यामुळे गुरुवारी (ता.17) तलावाच्या पाणी पातळी तीन फूट आणि वाढ होऊन ही पातळी 38 फूट 5 इंच इतकी झाली आहे. आता तलाव भरण्यासाठी केवळ आठ फूट पाण्याची गरज असून पाऊस असाच सुरू राहिल्यास आठवड्याभरात तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागामधून व्यक्त केली जात आहे. असे असले तरी पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती लागली आहे. याकडे लक्ष देत दुरुस्ती काम नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे हाती आहे. यापूर्वीच यमगर्णी वेदगंगा नदीमध्ये मुबलक पाणीसाठा होता. तेथून पाणी उपसा जवाहर तलावात करण्यात येत आहे. त्यामुळे पाणी टंचाई शहरवासियांना भासणार नाही. आता वेदगंगा नदी तुडुंब भरली असून पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असले तरी शुद्ध व सुरळीत पाणी पुरवठा करणे नगरपालिकेची जबाबदारी आहे. याची दखल घेत शहरात अनेक प्रभागात होणारा गढूळ व अळी मिश्रीत पाणी पुरवठा या नवीन पाण्यामुळे थांबण्याची शक्यता आहे. सध्या कार्यरत असलेल्या अभियंत्याकडे 4 नगरपालिकांचा कार्यभार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन कोलमडत आहे याची दखल घेत पूर्णवेळ अभियंता नेमण्याची कार्यवाही नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी चालविली आहे. शिवाजीनगरमधील काही भागात २४ तास पाण्याचे नळ जोडण्यात आले आहेत. मात्र त्या नळांना अद्याप पाणी आलेले नाही. याची दखल घेत सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
नगराध्यक्ष जयवंत भाटले व पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. आता तलावातले पाणी पातळी वाढत असल्याने नगराध्यक्ष भाटले व आयुक्त महावीर बोरण्णावर यांनी गुरुवारी दुपारी जवाहर तलावात येणाऱ्या पाण्याची पाणी पाहून समाधान व्यक्त केले आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक कार्यकर्ते सचिन लोकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तलावात येणाऱ्या ओढ्याची स्वच्छता केल्याने तलावात आता पाणी मुबलक येणार आहे.