
बंद घराला लक्ष्य : चोरीपूर्वी पथदीप केले बंद
निपाणी (वार्ता) : येथील मुरगुड रोड जवळील देवचंद कॉलेज समोर असलेल्या बालाजी नगर मधील रमेश वसंत पाटील त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पण तिजोरीत रक्कम अथवा दागिने नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. या घटनेमुळे बालाजी नगर, संभाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
रमेश पाटील हे भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. सुट्टीच्या काळात ते बालाजी नगर येथील आपल्या घरी काही दिवस वास्तव्यास असतात. सध्या केरळ येथे ते कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या समवेत परिवारही केरळ येथे वास्तव्यास आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून घराला कुलूप आहे. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर तिजोरी उचकटून तिजोरीतील सर्व साहित्य बाहेर टाकले. पण पाटील कुटूंबिय केरळला जाताना सर्व दागिने आणि रक्कम घेवून गेल्यामुळे सुदैवाने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
दरवाजाचे कुलूप तोडण्याचे अगोदर चोरट्यांनी बालाजी नगर परिसरातील सर्वच पथदीप बंद केले. त्यानंतर पाटील यांच्या घराच्या वरच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूंच्या दरवाजाला बाहेरून कडी घातली होती. पण अचानक त्यांंना खालील घरात काहीतरी फोडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांंनी आपला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता बाहेरून कडी लावली असल्याचे लक्षात आले. तात्काळ त्यांंनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. काही मिनिटातच मिनिटांत निपाणी पोलीस ठाण्याच्या हवालदार राजू दिवटे आपल्या तीन सहकार्यासह घटनास्थळी भेट दिली. पाटील यांच्या घराची पाहणी केली असता चोरांच्या हाती काहीच लागले असल्याचे दिसून आले. यावेळी अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी पळ काढला. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिसात झाली नव्हती.
Belgaum Varta Belgaum Varta