ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
कोगनोळी : एका रात्रीत बंद दुकानाची कुलपे तोडून चोरी केल्याची घटना कोगनोळी (ता. निपाणी) येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. या चोरीमध्ये रोख रकमेसह विक्रीसाठी ठेवलेले साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली अधिक माहिती अशी की, संजय बिरु कोळेकर व तानाजी आण्णाप्पा घोसरवाडे यांची येथील माळभागावरील हालसिद्धनाथ नगरामध्ये पानटपरीची दुकाने आहेत. या दोघांनी काल रात्री दुकाने बंद करुन घरी गेले होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे दुकाने उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी बंद दुकानाची कुलपे तोडून आत प्रवेश केला. यामध्ये विक्रीसाठी ठेवलेले साहित्य व गल्ल्यातील हजारो रुपये लांबविले. या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरीचा छडा लावण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या घटनेची माहिती निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाला देणार असल्याचे संजय कोळेकर यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta